अवकाळी पाऊस व कर्मचारी संपाने शेतकरी हवालदिल ! शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार ?
नगर:- जिल्हयातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेती पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक नुकसानीचे दुःख गिळायच्या आधी, नुकसान भरपाई तर सोडाच पण पिकांचे पंचनामे कोण करणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असल्याने त्यामुळे मोठया प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु राज्यातील शासकिय कर्मचारी संपावर असल्याने तलाठी, मंडलाधिकारी कुणीही उपलब्ध नसल्याने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.
नगर जिल्हयातील ग्रामिण भागातील शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे. रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे पावसाने झोपली आहेत. गहू , हरभरा, कांदा, फुले या पिकांसोबत संत्री, मोसंबी. लिंबू.फळबागा इ.पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडलेले आहेत. तलाठी, मंडलाधिकारी संपावर असल्याकारणाने नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर , कर्जत, जामखेड, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहुरी इ तालुक्यात अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे. तर काही ठिकाणी मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे.
आधीच अनेक समस्यांनी त्रस्त असणारा शेतकरी अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई तर दूरच परंतु पिकांच्या नुकसानीचे पंचनामे देखील नाही. या चिंतेने ग्रासला असून, एकीकडे अवकाळी पाऊसाचा तडाखा तर दुसरीकडे शासकिय कर्मचाऱ्यांचा संप यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा