भर उन्हाळ्यात कामरगावकरांची पाण्यासाठी वणवण.
नगर (प्रतिनिधी) – कामरगाव ता. नगर येथे सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे, कामरगावला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या तलावामधे मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. परंतु कामरगाव ग्रामपंचायतची पाणीपुरवठा नियोजनाबाबत उदासिनता दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच मुळा डॅम कनेक्शन देखील बंद असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांना वारंवार पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे.
कामरगाव हे नगर-पुणे महामार्गावर असलेले महत्वाचे गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे ४५०० हजारच्या आसपास आहे, मात्र सध्या ऐन उन्हाळ्यात गावाचे मुळा डॅम कनेक्शन बंद झाल्याने व गावातील पाणी पुरवठा तलावात मुबलक पाणी पुरवठा असताना देखील पाणी पुरवठा नियोजनाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची उदासिनता यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हातान्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे महिला वर्ग व ग्रामस्थांचे अतोनात हाल सुरु आहे, पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे, वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांची परिस्थिती देखील बिकट झाली आहे, ही बाब महिला व ग्रामस्थांनी ग्रा.पं. सदस्य गणेश रावसाहेब साठे यांच्या कानावर घातली असता त्यांनी याबाबत निवेदन तयार करून ते मा. उपअभियंता, देखभाल उपविभाग अहमदनगर यांना दिले असून निवेदनानुसार गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी येत्या ८ दिवसात मुळा डॅम कनेक्शन पूर्ववत सुरु करण्यास सांगितले असून तसे न झाल्यास महीला व ग्रामस्थ नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच त्यांनी ही बाब नगर-पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना देखील सांगितली असून त्यांनीही आपल्या स्तरावरून या प्रश्नांची तत्काळ दखल घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
या प्रसंगी निवेदन देताना ग्रा.पं. सदस्य हाबू शिंदे. हबीब पठाण, युवा नेते योगेश आंधळे, दिलीप नानेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
[ सध्या गावात भीषण पाणीटंचाई सुरु असून ग्रामस्थांना पाण्यासाठी ग्रामस्थांना नगर-पुणे महामार्गालगत असणाऱ्या मुळा डॅम पाईपलाईन लिकेज मधून येणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे काही अपघात देखील झालेले आहे, आमच्या काळात आम्ही ग्रामस्थांच्या सोयीसाठी नगर-पुणे महामार्गच्या वर व खाली असे दोन पाणी पोस्ट तयार केले होते, ते सध्या बंद अवस्थेत असून ते लवकरात लवकर सुरु करावेत अशी आमची मागणी आहे.]
गणेश साठे, ग्रामपंचायत सदस्य कामरगाव...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा