शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ द्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर( प्रतिनिधी) -  जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित "जिल्हा विकास आराखडा" तयार करण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात धार्मिक, साहसी व कृषी पर्यटनाला अधिक वाव आहे. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात पर्यटन विकासाचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा.  तसेच "शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.


            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडा तसेच शासन आपल्या दारी अभियान कामकाज संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदींची  प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात प्रसिद्ध अशा अनेक धार्मिक स्थळांबरोबरच साहसी व कृषी पर्यटनाला अधिक वाव आहे. जिल्ह्यातील धार्मिक व साहसी पर्यटन स्थळी पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा मिळून ते या ठिकाणाकडे आकर्षित व्हावेत व यातून रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी आराखड्यात या बाबींचा समावेश करण्यात यावा. लघु, मध्यम व दीर्घ मुदतीच्या विकासाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पर्यटन विभागाला केल्या.

"शासन आपल्या दारी" अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

"शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या लाभाबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्याला दोन लक्ष लाभार्थ्यांना विविध योजनेतून लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना अभियान काळात लाभ यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तालुकास्तरीय यंत्रणेला यावेळी त्यांनी दिल्या.बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !