शेतरस्ता बंद करुन वारंवार त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या.


नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतातील रस्ता भाऊबंदांनी बंद केल्याने  तसेच वारंवार शेतकऱ्याला त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून ५४ वर्ष  वय असलेल्या शेतकर्‍याने घराच्या समोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नगर तालुक्यातील घोसपुरी येथे उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी राजेंद्र लांडगे यांनी भाऊबंदानी शेतरस्ता बंद केल्याच्या तसेच त्रास दिल्याच्या कारणावरून आत्महत्या केली असून या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

           राजेंद्र दादाभाऊ लांडगे (वय ५४, रा.घोसपुरी, ता.नगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना त्यांचे भाऊबंद गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी त्रास देत होते. काही दिवसापुर्वी त्यांचा शेतातील रस्ता ट्रॅक्टर आडवा लावून अडवण्यात आला. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापूर्वी शेतकरी राजेंद्र लांडगे यांनी  तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे स्पीडपोस्टने निवेदनही पाठवले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास  घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे समजते. सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर सदर घटनेची माहिती

 नगर तालुका पोलिसांना  देण्यात आली.पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार सुभाष थोरात, चालक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मयत राजेंद्र लांडगे यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली असून त्यामध्ये ११ जणांची नावे असून आपल्या मृत्यूस हे सर्वजण जबाबदार असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली व त्यानंतर सुसाईड नोटमधे नावे असलेल्या व्यक्तींपैकी चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

        याबाबत मयताचा मुलगा अमोल राजेंद्र लांडगे (वय २७, रा. टेंभी मळा, घोसपुरी ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी सुखदेव कान्हू लांडगे, कमल सुखदेव लांडगे, तात्याराम सुखदेव लांडगे, सुधीर राधूजी करंजूले, पोपट मच्छिंद्र लांडगे, दत्ता मच्छिंद्र लांडगे,हनुमंत सुर्यभान लांडगे, कौंसाबाई मच्छिंद्र लांडगे, आशाबाई मच्छिंद्र लांडगे, दिपाली पोपट लांडगे,राजूबाई अरुण हंडोरे (सर्व रा. घोसपुरी ता. नगर) यांच्या विरूद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

         मयत राजेंद्र लांडगे यांच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी उशिरा घोसपुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर तहसिल कार्यालयातील कर्मचारी सुहास लांडगे यांचे ते वडील होते. तसेच त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !