कामरगाव शिवारात अवैध बायो-डिझेल विक्रीचे रॅकेट उघडकीस !
नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील नगर पुणे महामार्गालगत पून्हा अवैधरित्या बायोडिझेलची अवैध विक्री होत असल्याचा स्कॅम नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे.
समजलेल्या माहितीनुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने नगर - पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात कारवाई करत बायोडिझेल विक्री साहित्य व वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ७५ हजार ४१० रुपये किंमतीचे ६ हजार ९५ लीटर बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईमधे पाच जणांविरुद्ध नगर पोलीस तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ मुरलीधर बळी (वय ४७ रा. भाजी मार्केटच्या पाठीमागे सारस नगर ), कृष्णा ताराचंद राऊत (वय२५. रा. झोपडी कॅन्टीनशेजारी सावेडी ), खंडू काकासाहेब गोरडे (वय 23. रा. बालम टाकळी ता. शेवगाव देविदास जाधव व भरत कांडेकर (दोन्ही रा. नगर पूर्ण नावे माहित नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील जाधव व कांडेकर पसार झाले आहेत असे समजते.
नाशिक परिक्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. हे पथक नगर शहरासह जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी येत असते. विशेष म्हणजे या आधी देखील या पथकाने धाडसी कारवाया करत अवैध धंद्यावर छापे मारी केली आहे. या पथकाने शनिवारी (दि. 26 ) रात्री साडेदहाच्या वाजण्याच्या सुमारास नगर पुणे महामार्गालगत सुरु असलेल्या कामरगाव शिवारातील बंद असलेले यश हॉटेलच्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या बायोडिझेल विक्रीवर छापा टाकत कारवाई केली आहे. यामधे ६ हजार ९५ लीटर बायोडिझेल, विक्री करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व बायोडिझेल भरण्यासाठी आलेली वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून दोघे पसार असल्याचे मिळालेल्या माहिती नुसार समजते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा