कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम. ;आधुनिक शिक्षणासोबत विदयार्थ्यांना पारंपारिक कलेची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न !
नगर( हेमंत साठे):- तालुक्यातील नगर- पुणे महामार्गालगत असणाऱ्या कामरगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांच्या संकल्पनेतून विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणासोबत आपल्या पारंपारीक कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परीषद शाळा या आता आधुनिक शिक्षणाची कास पकडत आहेत. काही गावांमधून डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधे आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आधुनिकते सोबत आपली संस्कृती, पारंपारीक कला विदयार्थ्याना माहित व्हावी. त्यांच्या मधील कलागुणांचा विकास व्हावा. या उद्देशाने कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांनी विद्यार्थ्याना सोबत घेऊन गावातीलच कुंभार काका मोहन बाबा गोरे यांच्या घरी सुरू असलेल्या मातीच्या वस्तु बनविण्याच्या छोट्याश्या कारखान्यावर भेट दिली.
यावेळी मोहन गोरे यांनी देखील मोठया आनंदाने चिमुकल्यांचे स्वागत केले. व येणाऱ्या पोळा सणासाठी सुरू असलेल्या मातीच्या बैल कलाकृती कशा पद्धतीने बनविल्या जातात. याचे प्रात्यक्षिक दाखवत चिमुकल्यांना माहिती दिली. यावेळी रोजच्या शाळेच्या अभ्यासा व्यतीरीक्त वेगळ्या कलाकृती प्रात्यक्षिकाची माहिती घेताना विदयार्थ्याच्या चेहऱ्यावरती कुतुहल होतं. कुंभार काका मोहन गोरे व गोरे आजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांना अगदी लहान होऊन त्यांच्याच भाषेत कलाकृती कशा बनतात याची सविस्तर माहिती दिली व प्रात्यक्षिक देखिल करून दाखवले.
अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थ्याच्या कलागुणांना चालना मिळावी त्यांचा व्यक्तीमत्व व कलागुणांचा विकास व्हावा यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. पारंपारीक कलाकृती कशी बनते याचा अनुभव घेतल्यानंतर चिमुकल्यांच्या डोळयात एक वेगळाच आनंद होता. तसेच कुंभार काका मोहन बाबा , गोरे आजी यांनी आपुलकीने दिलेल्या माहिती बद्दल मनातून आदरभाव व प्रेम व्यक्त करत जिल्हा परीषद शाळेची चिमुकली जड पावलाने परत शाळेत परतली.
या अभिनव उपक्रम भेटी वेळी मातीपासून पारंपारीक कलाकृती बनविण्यासाठी नगर तालुक्यात प्रसिदध असणारे मोहन गोरे व किशन गोरे , चंद्रकांत गोरे , तसेच गोरे आजी तसेच गावातील प्रगतशील शेतकरी संतोष ठोकळ, सेवानिवृत्त हाबू , हा. सा शिंदे सर,गोरे परिवार,व जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षिका उपस्थित होत्या.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा