चास गावात सैनिकहो तुमच्यासाठी" कार्यक्रम उत्साहात संपन्न. ; सैनिकांप्रती आदरभाव त्यांच्या कर्तव्याची भावना प्रत्येकाने जपण्याची गरज - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ.

 

अहमदनगर (हेमंत साठे):- देश रक्षणार्थ सैनिकांचा त्याग, बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. देशाच्या सुरक्षिततेमुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. सैनिकांप्रती आदरभाव त्यांच्या कर्तव्याची भावना प्रत्येकाने जपण्याची गरज आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, प्रश्नांचे संकलन करून येत्या पंधरा दिवसात त्यांचा निपटारा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.


अहमदनगर तालुक्यातील चास या गावी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताहानिमित्त "सैनिकहो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त राणी ताठे,उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, नाशिकचे उपजिल्हाधिकारी विठ्ठलराव सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, अहमदनगरचे तहसीलदार संजय शिंदे, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैंदाने आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, संरक्षण क्षेत्रात जिल्ह्यातील १४ हजार सैनिक कार्यरत आहेत. या सैनिकांचे ४३ हजार कुटुंबीय असून या कुटुंबांच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची व प्रशासनाची आहे.राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून "सैनिकहो तुमच्यासाठी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. सैनिकांच्या पाणंद रस्ते, शिवरस्ते, विविध प्रमाणपत्र यासारख्या समस्या आहेत. या समस्यांच्या  संकलनासाठी समिती स्थापन करून त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून या योजना जिल्ह्यातील माजी सैनिकापर्यंत पोहोचवून एक आदर्श मॉडेल निर्माणासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  चास या गावामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न त्वरेने सोडविण्याबरोबरच अंगणवाडी व  पशु वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्नही सोडविण्यात येईल. गावात मंडळ अधिकारी कार्यालयाच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्याबरोबरच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सैनिकी वसतिगृहासाठीच्या एक कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिली.


 शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिकांना किमान सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष सेल निर्माण करण्यात येईल. सैनिकांच्या जमीन वाटपाची प्रकरणेही गतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपायुक्त रमेश काळे म्हणाले की, माजी सैनिकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचून त्या सोडविण्यासाठी  आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. १५ वर्षाची सेवा करून तारुण्यात सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सैनिकांच्या प्रश्नासाठी विशेष उपक्रम राबवून त्यांच्या समस्या सोडविणारे आपले राज्य हे देशातील एकमेव राज्य असल्याचे सांगत चास गावात अनेक सोई-सुविधांची आवश्यकता असून त्या प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, महसूल दिनाऐवजी संपुर्ण सप्ताह राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला.पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम जिल्हातील १४ ही तालुक्यात  राबविण्यात येऊन माजी सैनिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर  विद्यासागर कोरडे म्हणाले की, महसूल सप्ताहामध्ये माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष दिवस राखीव ठेवल्याचा मनस्वी आनंद होत आहे. शासनाच्या ४५ योजना माजी सैनिकांपर्यंत पोहोचून त्याचा त्यांना लाभ देण्यात येत आहे. गत वर्षात २ कोटी  रुपयांपेक्षा अधिक तर चालू वर्षात ६० लक्ष रुपयांचा लाभ या योजनांच्या माध्यमातून माजी सैनिकांना देण्यात आला असून माजी सैनिकांच्या प्रश्नाबद्दल प्रशासन नेहमीच संवेदनशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वीरमाता सिंधुबाई रंगनाथ जाधव, परिबाई अंबादास शिंदे, दगडाबाई तुकाराम वामन तसेच वीरपत्नी मिनाबाई भानुदास गायकवाड, कल्पना अंकुश जवक, शिलाबाई बाबासाहेब वाघमारे रोहिणी रामचंद्र थोरात, छाया भानुदास उदार, शीतल संतोष जगदाळे, सुमित्रा भास्कर बोदाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच माजी सैनिकांना स्वयंरोजगार अनुदान, घरबांधणी अनुदानाचेही वाटप करण्यात आले.

  प्रथम मान्यवरांच्या दीप प्रज्वलन  तसेच अमरजवान ज्योतीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमास वीरमाता, विरपिता, वीरपत्नी, माजी सैनिक यांच्यासह  चास गावचे सरपंच युवराज कार्ले, उपसरपंच, आजी माजी सरपंच, पदाधिकारी व  ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*कार्यक्रम स्थळी विविध विभागांचे मदत कक्ष*

"सैनिकहो तुमच्यासाठी" कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या मदत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पोलीस विभाग यासह इतर विभागांचा सहभाग होता. विभागांच्या असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित माजी सैनिकांना या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक या कक्षातून करण्यात आली.

📲 *बातमीसाठी संपर्क:- 7057791882*




टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !