नगर तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान ! शेतकऱ्यांना मागील वर्षीची अतिवृष्टीची मदत मिळाली नसताना पुन्हा अस्मानी संकट !

 

नगर (हेमंत साठे)- नगर जिल्ह्याच्या  दक्षिण भागात रविवार (दि.२६) पासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत थैमान घातलेले आहे.  अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील नगर व पारनेर तालुक्यातील गावांना गुरुवारी (दि.३०) रात्री पुन्हा एकदा मुसळधार वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, अवकाळी पावसाने नगर तालुक्यात जोरदार हजेरी लावत्यामुळे  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नगर तालुक्यात झालेल्या पावसाची आकडेवारी :- 

गेल्या रविवार (दि.२६) पासून दररोज अवकाळी पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (दि.३०) रात्री १० वाजेनंतर नगर शहर परिसरासह तालुक्यात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. नगरच्या नालेगाव मंडलात २६.८ मिमी, सावेडी ५७ मिमी, कापूरवाडी ३९.८ मिमी, केडगाव ४५.५ मिमी, भिंगार १५ मिमी, नागापूर १६.५ मिमी, जेऊर ५५.५ मिमी, चिचोंडी पाटील २३.५ मिमी, वाळकी १६.३ मिमी, चास ५१.३ मिमी, रुईछत्तीसी १४.३ मिमी असा नगर शहर आणि तालुक्यात सरासरी ३२.८ मिमी पाऊस झाला आहे. 


नगर तालुक्यातील कामरगाव मध्ये शेतमालाचे मोठे नुकसान !

नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील मका, ज्वारी, तूर ही पिके भुईसपाट झाली. तर काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. गहू व हरबरा, फुलपीक या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.



तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी..

कामरगाव परिसरात पावसामुळे नुकसान झाल्याने मंडळ कृषि अधिकारी श्रीमती राऊळ मॅडम, कृषी सहाय्यक देवकर यांनी नुकसानीची पाहणी केली.  शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविला. यावेळी ,  मा.उपसरपंच अनिल आंधळे, सिद्धांत आंधळे, गणेश मच्छिंद्र साठे, अरुण भुजबळ, अंकुश खोडदे, अमोल कातोरे आदी उपस्थित होते.

या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत आणि शासनानेही विनाविलंब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी  मागणी कामरगाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


शेतकऱ्यांना मागील वर्षीची अतिवृष्टी मदत मिळाली नाही तर या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार का ? चिंतेने शेतकरी हवालदिल...

कामरगाव व पिंपळगाव कौडा येथील शेतकऱ्यांचे मागील वर्षी २०२२ मधे झालेल्या अतिवृष्टीने शेत मालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु एक वर्ष उलटून गेले तरी अतिवृष्टी मदत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आता अवकाळी मुळे झालेल्या नुकसान भरपाई कधी मिळणार ? या चिंतेने कामरगाव व परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कामरगाव व पिंपळगाव कौडा गावातील शेतकऱ्यांची मागील वर्ष २०२२  अतिवृष्टीची तसेच अवकाळी पावसाने आता झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना दयावी. तात्पुरता शेतमालाच्या पंचनाम्याचा फार्स करू नये. अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !