सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे कामरगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी शालेय विदयार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील बालवाडी मधे 11 वर्ष व अंगणवाडीमधे 22 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. याकरिता दि 16 ऑगष्ट रोजी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पाताई सोनवणे मागील 4 वर्षांपासून कै.रामचंद्र सोनवणे व मालनबाई सोनवणे या त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम कुठलाही गाजावाजा न करता तसेच कुठलाही प्रसिद्धी सोस न बाळगता यशस्वीपणे राबवत आहेत.
कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी पुष्पाताई सोनवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी विदयार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्याविषयी, घर, शाळा, गाव स्वच्छतेचे महत्व सांगत, प्रामाणिक आचरण ठेवण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका लक्ष्मी गायकवाड, अंगणवाडीच्या सुजाता जाधव, सुमन भुजबळ, वैशाली मंडले, वैशाली गोरे, स्वाती साठे तसेच भिमाबाई आंधळे व बबीता आंधळे यांची उपस्थिती होती. अंगणवाडीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर देखील मुलांच्या शिक्षणाविषयी जागरुकता व आस्था दाखवत विदयार्थ्यासाठी उपक्रम राबवत असलेल्या पुष्पाताई सोनवणे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
खालील लिंकवर क्लिक करुन चॅनलला SUBSCRIBE करा...
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा