पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.
अहिल्यानगर (हेमंत साठे):- जिल्ह्यातील नगर तालुक्यात पिंपळगाव कवडा नावाचे एक छोटेसे गाव आहे. आज जरी नगर तालुक्यात असला तरी पूर्वी हा गाव पारनेर परगण्यात होता.या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लागला आहे. गावात ठिक ठिकाणी ऐतिहासिक खुणा नजरेस पडतात. याच गावच्या प्रवेश द्वारावर म्हणजे वेशीवर एक शिलालेख कोरलेला आहे. वेशीला रंग दिलेला असला तरी शिलालेख वाचता येतो.त्याचे वाचन कामरगावचे इतिहास अभ्यासक श्री सतीश भीमराव सोनवणे यांनी केले.
ते असे
१.|| शके १७०६ क्रोधी नाम संवछरे||
२.||माघ वद्य त्रयोदसी ते दीवसे भ||
३.|| बहेरो अनंत जागीरदार जोसी कुळ
४.|| कर्णी मौ पिपळगाव कवडा पा| पार
५.|| नेर लागवाड रुपय १००१
शिलालेखाचा अर्थ-
शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी क्रोधी नावाच्या संवत्सरात माघ वद्य त्रयोदशीला बहिरो अनंत जहागिरदार यांनी मौजे पिंपळ गाव कवडा परगणे पारनेर येथे १००१ रुपये खर्च करून वेशीचे बांधकाम केले.
मिती - शके १७०६, माघ वद्य त्रयोदशी, वार सोमवार, पिले जंत्री नुसार इंग्रजी तारीख - ०७ फेब्रुवारी १७८५
शिलालेखाची लिपी - खोदीव स्वरुपाचा हा शिलालेख बाळबोध देवनागरी लिपीत आहे. यात अंकावरही रेघ मारलेली दिसते यावरुन अगोदर रेघ मारून नंतर अक्षरे लिहिण्याचा मोडी लिपीचा प्रभाव यात दिसून येतो.
शिलालेख संशोधक आणि वाचक - श्री. सतीश भीमराव सोनवणे
शिलालेखातील व्यक्तिनामे - बहिरो अनंत
शिलालेख कारकिर्द - सवाई माधवराव पेशवे
कोण होते बहिरो अनंत?
पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांना पाच मुले आणि दोन मुली होत्या. त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव बहिरो अनंत. २२ जानेवारी १७५७ रोजी अंताजींचा एक मुलगा अब्दालीच्या वजीरासोबत झालेल्या लढाईत मारला गेला. काही इतिहास अभ्यासकांच्या मते बहिरो अनंत पटकीच्या रोगाने मृत्य पावले.अंताजींची सून सती गेल्या नंतर त्यांनी गावात सती बंदी केली असे म्हणतात.परंतु त्यांच्या मृत्यूची तारीख मात्र सापडत नाही. ही तारीख इसवी सन १७५४ च्या अगोदरची असावी असे इतिहासकार मानतात. बहिरो अनंत यांच्या पानिपत लढाईच्या नंतरच्या नोंदी मात्र पेशवे दफ्तरात सापडतात.या बहिरो अनंत द्वितीय यांच्या असाव्यात.
पानिपतावर मराठ्यांचा संहार उडाला त्यामुळें तिकडील त्यांचा अंमळ उखडून काढण्याचे प्रयत्न त्यांच्या शत्रूंनी लगोलग सुरू केले. राजपूत, जाठ, रोहिले, बुंदेले इत्यादींनीं उठाव चालू केला असतां, ठिकठिकाणच्या मराठे सरदारांनीं आपापल्या क्षेत्रांत शक्य तितका टिकाव धरला. अंतर्वेदित प्रयागपासून वर इटाव्यापर्यंतचीं मराठ्यांचीं ठाणीं शुजाउद्दौल्याने घेतलीं. इटाव्यापासून हरद्वारपर्यंतचा प्रदेश रोहिल्यांनीं दाबला. खुद्द अब्दालीनें पंजाबवर नेट धरला, परंतु तिकडे त्यास शीखांनीं राह देऊन सरहिंदच्या पुढें येऊं दिलें नाहीं. पुढे प्रकृती क्षीण होऊन अब्दालीचा मृत्यू १४ एप्रिल १७७२ मध्ये काबूल येथे झाला.दरम्यान नारो शंकर व त्याचा पुतण्या विश्वासराव लक्ष्मण, विठ्ठल शिवदेव, गोविंदपंताचे दोघे कर्तबगार पुत्र बाळाजी ब गंगाधर, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे द, पवार, बहिरो अनंत अशी अनेक मंडळी आपापल्या परीने उत्तरेत मराठी सत्ता टिकविण्याची शिकस्त करीत होती. बुंदेलखंडांत आपला ताबा त्यांनीं लगोलग बसविला.
१७६३-६४ च्या बाळाजी जनार्दन यांच्या रोजकीर्दीतील नोंदी नुसार २००० स्वार बाळगण्यासाठी बहिरो अनंत यांना सनद देण्यात आली होती. या सनदे नुसार ग्वाल्हेर सरकारची विभागणी बहिरो अनंत आणि विठ्ठल शिवदेव यांच्यात करण्यात आली. गडभई, नरसीगड, हमीर पूर यांचा सरंजामही बहिरो अनंत यांच्या कडे देण्यात आला.
इसवी सन १७६६ मध्ये बहिरो अनंत आणि विठ्ठल शिवदेव गोहदच्या बंदोबस्तास होते.
८ ऑगस्ट १७६६ रोजीच्या एका पत्रात मानाजी शिंदे रघुनाथ रावांना त्यांच्या तयारी बद्दल अवगत करतात आणि बहिरो अनंत त्यांना येऊन मिळतील अशी माहिती देतात.
१५ नोव्हेंबर १७६७ नजीबखान रोहिला आणि बहिरो अनंत यांची लढाई.यात नजीब खानाची बरीच माणसे मारली गेली व त्याची पिछेहाट झाली.
इसवी सन १७७० ते१७७३ च्या दरम्यान गडभई चा सरंजाम बहिरो अनंत यांचेकडून काढून घेण्यात आला आणि तो भवानराव शामराव यांच्याकडे देण्यात आला.
इसवी सन १७८३मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघानंतर पेशवे वाड्यात आले तेव्हा त्यांना अनेक सरदारांनी नजरा केल्या त्यात बहिरो अनंत कामरगावकर असा उल्लेख येतो.
हे बहिरो अनंत इसवी सन १७९५ च्या खर्डा येथे झालेल्या लढाई पर्यंत हयात असावेत. या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला . या लढाईचा पोवाडा अनंत फंदी यांनी लिहिला आहे त्यात' कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले |' असा उल्लेख येतो तो बहुधा यांचाच असावा. यावरुन बहिरो अनंत दीर्घायू असावेत असे म्हणता येते.
या बहिरो अनंत यांच्याकडे कामरगावसह सहा गावांची जहागिरी होती. त्यापैकीच एक गाव होते पिंपळगाव कवडा. बहिरो अनंत यांची स्वतंत्र मुद्राही होती ती अशी-
श्री मार्तण्ड चरणी
तत्पर
अनन्तसूत बहीरो
विराजते ||
यावरुन त्यांची मार्तंड खंडोबावर श्रद्धा असावी असे दिसते
शिलालेखात लागवाड रुपये असा उल्लेख आहे तो बहुधा चांदवाड रुपये असा असावा. कोरक्याने तो चुकून लागवाड असा कोरला आहे.
याकामी पिंपळगाव कवडा येथील शिक्षक श्री बबनराव बनकर यांचे सहकार्य लाभले.
संशोधक - श्री सतीश भीमराव सोनवणे
दि. २२.०२.२०२५
खालील लिंकद्वारे आपल्या YouTube चॅनलला SUBSCRIBE करा.
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=EgRQu2dcnJtdMx1P
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा