प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण द्या -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमधून आरोग्य सेवा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवकुमार वलांडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहेरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर समान ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनमानसांमध्ये व्यापक स्वरूपात जागृती करण्यात यावी. जिल्ह्यातील संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व योग्य उपचार होणे हे क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी झोपडपट्ट्या, ऊसतोड कामगार वसाहती, औद्योगिक क्षेत्रे अशा ठिकाणी तपासणीची संख्या वाढवावी. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिले.
डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र व मोठ्या गावांमध्ये गृहभेटी सातत्याने करण्यात याव्यात. डास निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी, साचलेले पाणी हटवणे व निर्जंतुकीकरण राखण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील जन्म व मृत्यूची नोंद वेळेत होावी, यासाठी खाजगी दवाखाने, प्रसुतीगृहांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नोंदी घेण्यात नियमित भेटी देऊन संकलन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस सर्व आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी तालुका दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा