शेतकऱ्यांच्या 'बांधावरच न्याय निवाड्याचा' कोपरगाव पॅटर्न !... शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर !... शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर ! तहसीलदार महेश सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील शेत - शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा केला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. कोपरगाव तहसीलदार यांच्या 'बांधावरच न्यायनिवाडा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 'कोपरगाव पॅटर्न' म्हणून राज्यात नावारूपाला आला असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, कौटुंबिक वाटणी आणि तुकडे यामुळे दरडोई जमीनधारणा कमी होत असून शेतरस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण होतात. त्यामुळे वेळ, श्रम व संसाधनांचा अपव्यय होऊन कायदा - सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यात गावनकाशानुसार अतिक्रमित किंवा बंद झालेले शिवाररस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग मोकळे करून वादग्रस्त रस्ते प्रत्यक्ष पाहणीद्वारे खुले करण्यात येत आहेत. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ६० रस्ते खुले करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, संवत्सर, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, रवंदे, धोडेंवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जऊर पाटोदा, धारणागाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, उक्कडगाव, मल्हार वाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगांव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, कासली- शिरसगाव रस्ता, कासली- पढेगाव रस्ता, कासली- उंदीरवाडी रस्ता, सडे व मनेगाव या गावातील शिवार रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर म्हणाले,"शेतजमिनींचे विभाजन व हस्तांतरणामुळे रस्त्यांवरील वाद वाढले आहेत. प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश असून, तहसीलदार महेश सावंत यांनी ६० प्रकरणे बांधावरच सामोपचाराने निकाली काढली आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचला असून, वाद कायमस्वरूपी मिटल्याने अपील व पुनर्विचार प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे."

तहसीलदार महेश सावंत यांच्या सांगण्यानुसार, " प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला‌ पाहिजे, असा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा 'बांधावरच न्यायनिवाडा' उपक्रम राबविला. शेतकऱ्यांचे एकमेकांमध्ये असलेले वाद सामंजस्याने मिटल्याने जय-पराजयाची भावना राहिली नाही. यामुळे अपीलांचे प्रमाण ही शून्य झाले"

या उपक्रमाचा फायदा घेतलेल्या सडे गावातील शेतकरी विजय पाटील, छब्बू बारहाते,सतिष बारहाते, तुळशीराम लोहकणे म्हणाले, “गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सतीच्या बांधाचा रस्ता वादग्रस्त होता. तहसीलदार महेश सावंत यांनी दोनदा बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वांच्या सहकार्याने रस्ता खुला केला. या निर्णयामुळे शंभरहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आता सर्वांसाठी खुला झाला आहे. अशा वादांचा निपटारा गावपातळीवर झाल्यास शेतकऱ्यांचे खरे हित साधते.”

‘बांधावरच न्यायनिवाडा’ या उपक्रमाने प्रशासन व शेतकरी यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण केले आहे. थेट बांधावर जाऊन वाद सोडविण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागात सामंजस्य, पारदर्शकता व न्यायाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.