ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड.. त्याला येणार फळ... त्याचे नाव केळ... अनोख्या आंदोलनाचे फोटोसह मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल. नगर तालुक्यातील या गावातील युवकांच्या आंदोलनाची चर्चा.
अहिल्यानगर तालुका (प्रतिनिधी) - ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड, त्याला येणार फळ, त्याचे नाव केळ अशा आशयाचे रस्त्यातील खड्ड्यांमधे केळीचे झाड लावून नगर तालुक्यातील भोरवाडी गावातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या अनोखा निषेध नोंदवत मजकूर फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गावच्या परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे गावकरी प्रचंड त्रस्त झालेले असताना ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद प्रशासन हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी अनोखे आंदोलन केले.
रस्त्यावरील खड्ड्यात केळीचे झाड लावून त्याची पूजा केली आणि त्याचे फोटो काढून त्यावर ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड, त्याला येणार फळ, त्याचे नाव केळ असा मजकूर लिहून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. या अनोख्या आंदोलनाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे.
नगर तालुक्यातील भोरवाडी गावात तरुणांनी हे आंदोलन केले आहे. भोरवाडीहून नगर ला येण्यासाठी भोरवाडी ते अकोळनेर हा अवघा ३-४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर गावातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. मोपेड चालविणाऱ्या महिलांना तर वारंवार अपघात होत आहेत. चारचाकी वाहन चालकांचीही खड्डे चुकवताना अक्षरशः दमछाक होत आहे.
या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअरपार्ट खिळखिळे होत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ही दुर्दशा कायम आहे. त्यामुळे गावकरी प्रचंड त्रस्त झालेले आहेत. दिवाळी सणासाठी बाहेरगावाहून राहणारे गावचे रहिवासी व पाहुणेही आले होते. या सर्वांनी या रस्त्याच्या दुर्दशेबाबत नाराजी व्यक्त केली.
सदर रस्ता हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे असल्याचे समजते, मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे ना जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देईना, ना ग्रामपंचायत याबाबत पाठपुरावा करेना असा आक्षेप संतापलेल्या तरुणांनी घेत. या रस्त्याच्या दुरावस्थेकडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या तरुणांनी या रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात केळीचे झाड लावले. त्याला हळदी, कुंकू, गुलाल, हार फुले, कोहळा वाहून नारळही फोडला. या लावलेल्या झाडाचे फोटो मोबाईल मध्ये काढून त्यावर ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड, त्याला येणार फळ, त्याचे नाव केळ असा मजकूर लिहून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची नगर तालुक्यात व परिसरातील गावांमध्ये तसेच सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा