रायतळे गावात आढळली मराठा सरदार राजेश्री संभाजी पवारांची ऐतिहासिक छत्री !
नगर( हेमंत साठे):- काही दिवसांपूर्वी इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी पारनेर तालुक्यातील रायतळे गावाला भेट दिली तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे एक सुंदर वास्तू नजरेस पडली. स्थानिक लोकांच्या मते हे महादेवाचे मंदीर आहे. जवळ जाऊन पाहिले तर हे मंदीर नसून मराठा सरदाराची छत्री असावी असे त्यांना वाटले. छत्री वर आठ ओळींचा देवनागरी शिलालेख आढळला. त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बऱ्यापैकी खराब झालेला असल्याने छाप घेऊनही काही शब्दच ओळखता आले. शिलालेख सुरुवात अशी -
१.राजेश्री संभाजी पवार, स्वराज्य उभारणीत ज्यांनी मोलाचं योगदान दिलं अशा पवार घराण्यातील योद्ध्याची राजेश्री संभाजी पवारांची ही छत्री. तेथेच समोर एक शिळा आहे ज्यावर शिव लिंग आणि अश्वारूढ मराठा सैनिक कोरलेला आहे
पराक्रमी पवार घराणे -
पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसिंग (शंभु सिंग ) पवारांना मानले जाते. निजाम शाहीत मलिक अंबरच्य काळात हे उदयास आले. सुरवातीला ते कामरगाव जवळच्या डोंगरात राहत असत. नंतर त्यांनी सुखेवाडी नावाचे गाव वसवले तेच आजचे सुपे. हंगे गावच्या दळवी पाटलाशी यांचा पाटीलकी वरून वाद होता.शहाजी राजांच्या काळात त्यांनी बऱ्याच गावात पाटीलक्या संपादन केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिला. महाराजांबरोबरही त्यांनी बऱ्याच कामगिरी केल्या. सुपे येथे त्यांची गढी आहे. यांचे सुपुत्र कृष्णाजी पवार महाराजांचे एक विश्वासू सरदार होते. यांनी अफजल खानाच्या स्वारी वेळी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना तीन पुत्र होते बुवाजी, रायाजी आणि केरुजी. यापैकी बुवाजि यांना दोन पुत्र होते थोरले काळोजी व धाकटे संभाजी. बुवाजी , रायाजी व केरूजी यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे साम्राज्याचा विस्तार करण्याचे कामास जमायत बाळगून मुलुखांतील बंडे मोडली व बंदोबस्त केला, आणि तापी तीरापर्यंत स्वराज्याचा अम्मल बसविला. अशीं मोठमोठी विश्वासाची कामे यानी बजावली म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनीं बुबाजी यास विश्वासराव हें सन्मानाचे पद व सरजाम दिला व केरोजी यास “ सेनाबारासहस्त्री "ही बहुमानाची पदवी दिली.
बुवाजी पवार यास पुत्र दोन त्यांची नांवें.
वडील पुत्र काळोजी पवार- यास पुत्र चार त्याचीं नावे
१ कृष्णाजी पवार विश्वासराव वडील.
२.तुकाजी पवार गणेगांवकर.
३. जिवाजी पवार हिंगणीकर.
४. मानाजी पवार सुपेकर धाकटे,
धाकटे संभाजी पवार यासी. पुत्र तीन त्यांचीं नांवे:
१ उदाजी पवार मलठणकर,
२.आनंद राव पवार कवठकर
३.जगदेवराव चितगांवकर.
कोण होते संभाजी पवार -.
संभाजी पवारांचा कार्यकाळ १७व्या आणि १८ शतकातील मानता येईल. यांच्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. बुबाजीचे धाकटे पुत्र संभाजी पवार हे जिंजीच्या वेढ्या पासून कामागिऱ्या बजावत असून छत्रपती शाहू महाराजांचे वेळीं लप्कर बाळगून मोहिमांवर जात असत, ही गोष्ट शाहु महाराजांची रोजनिशी लेखांक १ ( ता० २० मे १७१४ ) वरून स्पष्ट आहे. संभाजी पवार मोठा कर्ता पुरूष असून दीर्घायू होता. त्यानें प्रथम मलठणास नवीन घर बांधिलें व आपले मुलांस व नातवास आणखी पाटिलक्या व वतनें खरीद करून देऊन नगर जिल्ह्यांत निरनिराळ्या ठिकाणी बसविलें. संभाजी पवारास तीन पुत्र होते. उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव. यांपैकीं उदाजीरावांची मराठी साम्राज्याच्या इतिहासांत फार प्रसिद्धि आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे कितीतरी योद्धे विस्मृतीत गेले. त्यांच्या छत्र्या / समाध्या आजही अज्ञात आहेत.
उदाजी पवारांची कामगिरी-
मलठणचे पाटील संभाजी पवार यांचा हा मुलगा. संभाजी पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी मलठण येथें होते. हे सध्यांच्या धारच्या पवारांचे मूळ पुरुष औरंगजेबाच्या विरुद्ध रजपुतांस मराठयांनी मदत केली, त्या वेळी स. १६९८ मध्ये यानें माळव्यांत शिरून मांडव- गडास तळ दिल्याचा उल्लेख सांपडतो. तेव्हांपासून याचा माळव्याकडे राबता सुरू झाला. स. १७०९ मध्ये यानें मांडवगड काबीज केलें. स. १७१८ साली हा बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस गेला होता.
हा बाजीरावाचा लहानपणापासून मित्र होता. स. १७२४ मध्ये यानें आपलें ठाणें धार येथे बसविले. पुढे हा बाजीरावास डोईजड झाला.हे थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे यांचे दिवाण म्हणून काम करीत होते, असें स. १७२८-२९ चे कांहीं कागदपत्र छापले आहेत त्यांवरून ठरते ( धारसंस्थानचा इतिहास २, पा. ३०). प्रथम हे माळव्यांत आले, आणि मराठयांचा अंमल माळवा व त्याच्याहि पलीकडे पोचविण्याचा धाडसी उद्योग यांनीच यशस्वी केला. सोरठ, काठेवाड, वागढ, बुंदीकोट व बुंदेलखंड हे प्रांतही यांनी जिंकले असून तेथील चौथाई- सरदेशमुखीचा अंमल होण्याविषयां लिहिलेली ताकीदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून स. १७२८-२९ च्या सुमारास उत्तरेकडील राजकारणांत यांच केवढे स्थान होतें हैं चांगलें ध्यानांत येते. एवढा पसारा आवरण्यास कठीण म्हणूनच स. १७२८ च्या मे महिन्याच्या पूर्वी मल्हाररावांची व यांची उत्तरेकडे नेमणूक झाली.माळवा व गुजराथ या ठिकाणी मराठयांचा जम बस विणारा मुख्य इसम उदाजीच होय, असे स. १७२६ मध्ये शाहूनें ठरवून दिलेल्या सहा कलमी तहाबरून दिसून येते. १७२८ मध्ये बाजीरावाचे व याचे वांकडे आले व याला कैद करण्यांत आले. पुढे कैदेतून सुटल्यावर यानें मांडवगड काबीज केले.डभईच्या लढाईत हा बाजीरावाच्या विरुद्ध म्हणजे दाभाड्याकडून हजर होता.पुढे मांडवघाटावरील तिरलाच्या लढाईत यानें विशेष पराक्रम गाजवला (ता. १२-१०-१७३१ ).बढवाणीचा ठाकूर अनूपसिंग मराठयांस सामील झाला होता. त्याच्या मुलखास उपद्रव देऊं नये, असं आज्ञापत्र शाहूनें स. १७३५ मध्ये यास व मल्हारराव होळकर यास काढलें होतें (शा. रो. २०२ व २४१ ).
बाजीरावानें याला माळवा व गुजराथचा अर्धा मोकासा दिला. त्या सनदेत 'आमची सर्व इमारत तुम्हावरच आहे. येविसी आपलें समाधान असो देणे.' असे शब्द आहेत (मं. ८.१-२, पा. ३८-३९ ).इ. स.. १७३६ मध्ये सिद्दीवरील मोहिमेस जाण्याकरितां शाहूमहाराजांनी यास बोलावले .
सिद्दी अंबर अफवानी याच्याशी लढाई करून त्याला रायगडाखाली वाडीपाचाड येथे ( ब्रह्मद्रस्वामींचें चरित्र, लेखांक २७८) यानें ठार मारले व गोवळकोंब्यास वेढा दिला (स. १७३६ आक्टोबर). हे फार शूर असल्याने त्यांच्या बद्दल 'जिधर उदा उधर खुदा' असे म्हटले जात असे. यांचा मृत्यु मलठण येथे ई. स. १७६० मध्ये झाला.
© सतीश भिमराव सोनवणे
दि. १६.०९.२०२३
संदर्भ - १.धार संस्थानचा इतिहास, काशिनाथ कृष्ण लेले व शिवराम ओक २. मध्ययुगीन चरित्रकोश
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा