कामरगावात सापडले अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे. इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांचे संशोधन .


नगर ( हेमंत साठे):-अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ' माणसाची गोष्ट'  हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. याचे अस्तित्व दाखवणारी ठिकाणं आपल्या नगर जिल्ह्यात असतील हे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. अशाच एक अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ' मावलया डोंगरावर' आहे.  कामरगाव नगर तालुक्यातील एक गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे.  यातील  विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला त्यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली. तेथे डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे.  याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला.  आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी  भेट दिली. या वेळी त्यांना काही पुरावे सापडले ते असे सात उभ्या शिळा - यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेग वेगळा  असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.



सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो  घोडा किंवा उंट असावा. 

यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे. 

कोकणातील कातळ शिल्प सर्वानाच माहीत आहेत माञ असे शिळा शिल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच सापडले आहे. या     शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा असू शकते.

या परिसरतील इतर अवशेषही अभ्यासणे गरजेचे आहे. दक्खनच्या पठारावरील काळ्या कातळावर अमूर्त कोरीव शिल्पवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारे

 संशोधक श्री सचिन पाटील सर यांच्या मता नुसार कठीण बेसाल्ट खडकावर असे शिल्प आढळण्याची ही पहिलीच वेळ. या शोधा साठी त्यांनी सतीश सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री तेजस गर्गे यांना याबद्दल ई मेल द्वारे कळविण्यात आले आहे  या संदर्भात अधिक संशोधन करत असल्याचे सतीश सोनवणे यांनी सांगितले .या संशोधनास निवृत्त प्रा. श्री एम

 एन आंधळे  सर, श्री विक्रांत मंडपे सर, मिञ अर्जुन खाडे, प्रशांत साठे यांनी  मोलाची मदत केली.

© सर्व छायाचित्रे आणि संशोधन - श्री सतीश भिमराव सोनवणे,पत्ता - कामरगाव ता. नगर जि. अहमदनगर 

* बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !