सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६ परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया सिईओ आनंद भंडारी यांचे जिहयात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसआर संस्थाना आवाहन.

अहिल्यानगर ( हेमंत साठे):-   सीएसआर ही समाजाभिमुख विकासासाठीची प्रभावी साधनयोजना आहे. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक व मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी उद्योग व सीएसआर संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या गरजेनुसार व प्राधान्यक्रमानुसार निधीचे लक्ष्यित नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

​जिल्ह्यातील विविध विकासात्मक गरजांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा नियोजनबद्ध, समन्वयित व परिणामकारक वापर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६' परिषदेत डॉ. आशिया बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव दीपक दातीर, रमेश कासार, रोटरीचे डॉ. विनोद मोरे, क्षितिज झावरे, मर्लिन इलिशा, एव्हॅंजेलिन एलिशा, महेश गोपाळकृष्णन, तुषार देशमुख, सारिका मोरे, सुजाता उबाळे, हिरा मोतीयानी आदी उपस्थित होते.

​जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, "जिल्ह्याच्या विकासासाठी शासन तसेच प्रशासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये उद्योग व सीएसआर संस्थांची साथ अत्यंत मोलाची आहे. जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलस्रोत पुनरुज्जीवन, प्लास्टिकमुक्त अभियान, नवीकरणीय ऊर्जेचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा या बाबींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दुर्बल घटक, बालक व महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर संस्थांनी पुढाकार घ्यावा"

​"जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासन, उद्योग, सीएसआर संस्था व स्वयंसेवी संघटना यांच्यातील समन्वय अत्यावश्यक आहे. प्रत्येक सीएसआर प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकास आराखड्याशी सुसंगत असावा, निधीची परिणामकारकता व मोजता येण्याजोगे निष्कर्ष देणारा आराखडा असावा," अशी अपेक्षा व्यक्त करत सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांसाठी संस्थांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याबरोबरच आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, "जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५३२ पेक्षा अधिक शाळा असून ५ हजार ३०० अंगणवाड्यांतून सर्वसामान्यांच्या पाल्यांना शिक्षण देण्यात येते. शाळांमधून शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शालेय पायाभूत सुविधा बळकट करणे, डिजिटल शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे या क्षेत्रांमध्ये सीएसआरचा उपयोग होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ५०० पेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतून आरोग्याच्या सेवा देण्यात येतात. या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता याव्यात यासाठी सीएसआर संस्थांनी मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करत आरोग्य केंद्रे दत्तक घ्यावीत/घेण्यात यावीत."

" जिल्ह्यात सन २०२२ पासून 'मिशन आपुलकी' अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत असून प्रशासनाच्या गरजेनुसार सीएसआरचे नियोजन व्हावे," अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

" ​जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचतगटांद्वारे जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार महिलांना संघटित करत त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच एकल महिलांच्या पुनर्वसनाचे कामही करण्यात येत असून यासाठीही निधीचा उपयोग व्हावा," असेही त्यांनी सांगितले.

​परिषदेत शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, पाणलोट विकास, जलसंधारण, पर्यटन क्षेत्रांचा विकास, क्रीडा विकास, रस्ते सुरक्षा, जिल्ह्यातील गरजा, प्रलंबित प्रश्न, प्रस्तावित विकास प्रकल्प व अपेक्षित सीएसआर सहकार्य याबाबत सादरीकरण करण्यात आले. उद्योग प्रतिनिधींनी विविध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.

​परिषदेचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री फेलो शुभम बाबर यांनी केले तर जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी आभार व्यक्त केले. परिषदेस सर्व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, उद्योगांचे, सीएसआर संस्थांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*******************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.