पावसाळ्यात सर्व लोखंडी वीज खांब सुरक्षित करा.सिद्धांत आंधळे यांची मागणी.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- , दि. ७ : पावसाळ्यात लोखंडी वीज खांबांमध्ये शॉर्टसर्किट अथवा विद्युत गळती होण्याचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजितदादा पवार गट)चे तालुकाध्यक्ष सिद्धांत सुभाष आंधळे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. सपकाळे व संबंधित अधिकारी निकम यांची भेट घेऊन कामरगाव येथील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सर्व लोखंडी वीज खांबांना तातडीने पीव्हीसी (प्लास्टिक) संरक्षक कव्हर बसविण्याची आग्रही मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी केडगाव येथे लोखंडी वीज खांबाला विद्युत प्रवाह आल्याने एका अवघ्या चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अत्यंत वेदनादायी घटनेची गंभीर दखल घेत श्री. आंधळे यांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले व तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती केली.
आंधळे यांच्या मागणीची गंभीर दखल घेत उपकार्यकारी अभियंता श्री.सपकाळे यांनी येत्या दोन दिवसांत कामरगावसह नगर तालुक्यातील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या सर्व लोखंडी वीज खांबांचे सर्वेक्षण करून त्यांना पीव्हीसी संरक्षक कव्हर बसविण्याची कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य विद्युत अपघात टाळण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे अशी माहिती सिध्दांत आंधळे यांनी दिली.
केडगाव येथील दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कामरगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.
● सिद्धांत सुभाष आंधळे [राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अ.प. गट)]
● अध्यक्ष सुजय दादा विखे पा.विचारमंच कामरगाव

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा