सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विदयार्थी हितासाठी महत्त्वाचे निर्णय. विद्यार्थी-संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या संधी.

 

अहिल्यानगर(हेमंत साठे):-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. विद्यापीठाच्या सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित धोरणाची प्रचिती देणाऱ्या या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

व्यवस्थापन परिषदेमध्ये रशियातील मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठ (आरयूडीएन), जर्मनीमधील बायरॉईथ विद्यापीठ तसेच युनायटेड किंग्डममधील ससेक्स विद्यापीठ यांच्याशी शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमांसाठी सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली. या करारांमुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतीय ज्ञानपरंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील श्री सदगुरू समूहाच्या सहकार्याने भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणाली केंद्र तसेच भारतीय जीवनशैली आणि मूल्य शिक्षण या उपक्रमांच्या अंमलबजावणीस मंजुरी देण्यात आली.

तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एड्युलॅब एज्युकेशन एक्स्चेंज प्रा. लि. यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामार्फत विविध प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात एम.एस्सी. (व्हायरॉलॉजी) हा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान आणि विषाणूशास्त्र क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने व्यवस्थापन परिषदेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगर उपकेंद्रामध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली. ग्रामीण आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सामाजिक समावेशकता आणि समानतेच्या मूल्यांना अधोरेखित करत तृतीयपंथीय विद्यार्थ्यांकडून कोणतेही शैक्षणिक  शुल्क न आकारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. हा निर्णय तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

ज्ञानसंपदेचे जतन आणि संरक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या ऐतिहासिक आणि समृद्ध अशा जयकर ग्रंथालयाच्या विमा पॉलिसीच्या नूतनीकरणास देखील मान्यता देण्यात आली. दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि संशोधन साहित्याच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तसेच विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेसंदर्भातील कराराचे नूतनीकरण करण्यास व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. या योजनेचा लाभ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मिळणार असून, अपघाती घटनांमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक संरक्षण आणि मदत उपलब्ध होणार आहे.

याशिवाय विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थी सुरक्षा विमा योजना व विद्यार्थ्यांना आपत्कालीन सहाय्य या अर्थशीर्षातील तरतुदीत वाढ करण्यात आली.

विविध आर्थिक योजनांना मंजुरी यावेळेस देण्यात आली,

विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत 2026 27 करिता 19 कोटी रुपये अनुदान वाटपास मान्यता या अंतर्गत संलग्नित महाविद्यालय , मान्यताप्राप्त परिसंस्थांमध्ये फक्त परीक्षेचे कामकाजासाठी सीसीटीव्ही खरेदी अर्थसहाय्य योजना 

नियमित अभ्यास मंडळ कार्यशाला आयोजन अर्थसाह्य योजन

एन ए पी 20 20 अभ्यासक्रमाचा आढावा व पदवी च्या चौथ्या वर्षाची तयारी करण्याबाबत कार्यशाळा आयोजनात अर्थसहाय्य योजना 

विद्यार्थी परिसंवाद कार्यशाळा 

इंटर्नशिप कार्यशाळा अर्थसाह्य योजना 

अमली पदार्थ विरोधी कार्यशाळा 

संलग्नित महाविद्यालयांमध्ये सोलर सिस्टिम बसवण्याकरताअर्थसहाय्य योजना आदी योजनांचा समावेश आहे.

   विद्यार्थी कल्याण, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अधिक सक्षम आणि अग्रगण्य बनविण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजूर झालेले हे निर्णय महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .