अखेर साकळाई योजनेचा सर्वेक्षण कार्यारंभ आदेश जारी...


नगर - गेल्या तीस वर्षापासून बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. यासंबंधीचे पत्र खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, साकळाई कृती समितीच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला नगरमध्ये दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय विश्रामगृह भूमिपूजन, आढावा बैठक, विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी नगरमध्ये आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीदरम्यान साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेशाचे पत्र संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले. साकळाई योजना मार्गी लागण्यासाठी साकळाई कृती समितीने वेळोवेळी आमदार, खासदार व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. तसेच खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून साकळाई उपसा सिंचन योजनेचा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी खा. डॉ. सुजय विखे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी आणली होती. पण पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची अट असल्यामुळे सर्व्हेक्षणास सुरुवात होत नव्हती. ती अट वगळून नव्याने साकळाई सर्व्हेक्षणाचे आदेश राज्य सरकारने काढले होते. तसेच सर्व्हेक्षणासाठी २ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आता प्रत्यक्षात १८ मे २०२३ रोजी साकळाईच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. एक वर्षात साकळाई योजनेचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर आणि श्रीगोंदा तालुयातील जिरायत भागातील ३२ गावांसाठी साकळाई पाणी योजना वरदान ठरणारी आहे. ३० वर्षांपासून या योजनेची मागणी होत आहे; पण फक्त आश्वासनांशिवाय जनतेच्या पदरी काही पडत नव्हते. २०१८ च्या लोकसभा निवडणुकीवेळी डॉ. विखे यांनी या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. वाळकी (ता.नगर) येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साकळाई योजना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. २०२२ मध्ये भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आल्यावर खा. डॉ. विखे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी प्रयत्न सुरू केले. हा ३२ गावातील विविध पक्षांचे नेते,पुढारी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,कार्यकर्ताचा विजय आहे साकळाई योजनेचा सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश देतेवेळी संबंधित संस्थेचे ठेकेदार गांगर्डे, जलसंपदा विभागाचे अधिकारी स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता बबन वाळके, साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, सुरेश काटे, सोमनाथ धाडगे, उद्योजक ज्ञानदेव भोसले, योगेश झेंडे, संतोष लगड उपस्थित होते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !